मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संसदेत बोलताना काँग्रेसवर टीका केली. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. त्यावरून काँग्रेस नेते संतप्त झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील जनता अडचणीत असताना काँग्रेस कार्यकर्ते लोकांची मदत करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र देशाची संपत्ती विकत होते. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही. ते स्वतःला देशाचे पंतप्रधान नाही तर भाजपचे प्रचारक समजतात अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


पंतप्रधान मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. जगात कोरोनाचे रूग्ण मिळाले तेव्हा राहुल गांधी उपाययोजना करण्यास सांगत होते. तर, पंतप्रधान नमस्ते ट्रम्प करण्यात व्यस्त होते. पंतप्रधानांनी केलेल्या बेजबाबदार वर्तनामुळेच देशात कोरोनाचे रूग्ण वाढले असा आरोप पटोले यांनी केला.


मोदींच्या गुजरातमध्ये हे उत्तर भारतीय कामगार उपासमारीने त्रस्त होते. त्याचवेळी महाराष्ट्रात काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. संकटात असणाऱ्या परप्रांतीय बांधवांची मदत करण्याचा मानवधर्म आम्ही निभावला, असे ते म्हणाले.


काँग्रेस कार्यकर्ते मदत करत होते त्यावेळी पंतप्रधान लोकांना टाळ्या, थाळ्या वाजवायला सांगून देशाची संपत्ती आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत  होते. कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारे पाडण्यात व्यस्त असल्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. पण, आज गरिबांची मदत केली म्हणून काँग्रेसवर टीका करत आहेत. पंतप्रधानांचे हे वागणे म्हणजे 'उल्टा चोर कोतवाल को डांटे' असेच असल्याचा टोला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.