रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मूक अभिनयाने वेड लावत लोकप्रियतेच्या शिखरावर उधळलेल्या वळूने रविवारी एक्झिट घेतली. उमेश कुलकर्णी यांच्या वळू चित्रपटातून या मूक अभिनेत्याने संपूर्ण महाराष्ट्रात धमाल केली होती. सांगलीतील पांजरपोळमध्ये वास्तव्यास असलेल्या या तीनशे किलो वजनाच्या वळूचे निधन झाल्यानंतर अनेकजण हळहळले. जुना बुधगाव रस्त्यावरील मळ्यामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंजारपोळ संस्थेच्या वतीने वळूला आदरांजली वाहण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शक उमेश कुलकर्णींच्या 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. खरं तर वळू हाच या चित्रपटाचा नायक... दिसायला देखणा...तब्बल तीनशे किलो वजन...लालसर डोळे...दहशत बसावी अशी जाडजूड शिंगे... अशा शरीरयष्टीचा हा वळू मूळचा सांगलीतल्या पांजरपोळातील...


चित्रपटासाठी पाहिलेल्या तब्बल तीनशे वळूंमधून या वळूची निवड दिग्दर्शकानं केली होती. असा हा वळू काही दिवसांपासून मात्र आजारी होता... त्यानं खाणं-पिणं सोडलं होतं...त्याचं वजनही तब्बल शंभर किलोनं घटलं होतं... त्याच्यावर औषधोपचार सुरू होते... पण जास्त वजन आणि वळू वृद्ध झाल्यानं उपचारास साथ मिळाली नाही... अखेर रविवारी त्याचं निधन झालं. 


पांजरपोळ संस्थेच्याच जुना बुधगाव रस्त्यावरील मळ्यामध्ये वळूवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज हा वळू जिवंत नसला तरी सिनेमाच्या माध्यमातून कायमच तो आपल्या स्मरणात राहील.