दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : दहावी (SSC Exam), बारावीच्या (HSC Exam) परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता वैद्यकीय शाखेच्या परीक्षाही पुढे ढकलण्याचे संकेत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेयत. विद्यार्थींच्या जीविताला धोका होणार नाही ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या तर ढकलाव्या लागतील असे ते म्हणाले. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय शाखेच्या परीक्षांबाबत विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. कोरोनामुळे निर्बंध आहेत त्यामुळे विद्यार्थींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती मला विद्यार्थी संघटनांनी दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे देशमुख म्हणाले. 



एमबीबीएस शेवटच्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होणारे ५५०० डॉक्टर आपल्याला उपलब्ध होतील.  जिथे आवश्यकता आहे तिथे हे डॉक्टर नेमण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 15 ते 16 हजार नर्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्यांच्या नोंदणी प्रक्रियेला गती दिली आहे. त्यामुळे या नर्सही कर्तव्यासाठी उपलब्ध होतील असेही ते म्हणाले. 


ज्या राज्यात कोविडचा फारसा प्रादुर्भाव नाही, त्या राज्यातून डॉक्टर्स, नर्स उपलब्ध करून देण्याची मागणी नोंदवली आहे. सेवानिवृत्त झालेले डॉक्टर, नर्स यांची सेवा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संकट मोठं असलं तरी महाराष्ट्र तत्परतेने पावलं उचलत असल्याचे ते म्हणाले.