प्रणव पोळेकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : संतोष परब हल्ला प्रकरणानंतर सिंधुदुर्गात पुन्हा एकदा राजकीय शिमगा सुरू झालाय. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे (Narayan Rane) सुपुत्र आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांचं (Nitesh Rane) नाव पुढे आल्यानं त्यांची अटक अटळ मानली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे तातडीने मुंबईला रवाना
भाजप आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झालेली असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज दुपारी चार वाजता नारायण राणे नागपुरात एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. त्यासाठी ते आज सकाळीच नागपुरात दाखल झाले. दुपारी नितीन गडकरींसोबत (Nitin Gadkari) कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर नियोजित कार्यक्रमाला न थांबता राणे तातडीनं मुंबईकडे रवाना झाले आहेत. 


जामिन अर्जावर उद्या सुनावणी
दरम्यान भाजप आमदार नितेश राणेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात उद्या ही सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांचं नाव आल्यानं नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 


गोवा आणि मुंबई पोलिसांची मोठी फिल्डिंग? 
पोलिसांनी कणकवलीत मोठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जातं आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांनी नितेश राणेंना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ते गैरहजेर राहिले. त्यामुळेच नितेश राणेंच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 12 उच्चस्तरीय पोलीस अधिकारी कणकवलीत ठाण मांडून आहेत. नितेश राणे हिवाळी अधिवेशनासाठी हजर राहिले तर मुंबई पोलीस त्यांना अटक करू शकतात. त्यांनी चार्टर्ड विमानानं दिल्लीला जाण्याचा प्रयत्न केला तर गोवा विमानतळाशी संपर्क साधून तिथंच त्यांना अटक होऊ शकते. 


काय आहे प्रकरण ? 
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर संतोष परब यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आमदार नितेश राणे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांच्यावर हल्लाचे आरोप केले होते. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. तर शिवसेनेनं मार्चा काढत आरोपींची नावं जाहीर करण्याची मागणी केलीय. 


गेल्या आठवड्यात आदित्य ठाकरे विधानभवनात जात असताना नितेश राणेंनी त्यांची म्यॅव म्यॅव करत टिंगल केली होती. याची राज्यभर मोठी चर्चा झाली होती. त्यामुळेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.