उदयनराजेंना धक्का देण्यासाठी शरद पवार साताऱ्यातून लढणार?
उदयनराजे भोसले यांनी भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : उदयनराजे भोसले यांनी भावनेच्या भरात केलेलं वक्तव्य आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत शरद पवार उभे राहिल्यास आपण निवडणूक लढवणार नाही, असं माजी खासदार उदयनराजे भोसलेंनी मंगळवारी देवाची शपथ घेऊन सांगितलं होतं. त्यानुसार आता शरद पवारांनीच पोटनिवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आग्रह आहे.
सातारचा उमेदवार ठरवण्यासाठी बुधवारी मुंबईत पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक होणाराय. त्यावेळी उदयनराजेंना धक्का देण्यासाठी पवारांच्या नावाचा आग्रह राष्ट्रवादीचे नेते धरणार असल्याचं समजतं आहे.
काहीच दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या साताऱ्याच्या जागेवर २१ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणूक आणि साताऱ्याची पोटनिवडणूक एकाच दिवशी होणार आहेत.