थंडी बेतली जीवावर; शेकोटीने घेतला जीव ; नागपुरमधील भयानक घटना
शेकोटीने एकाचा जीव घेतला आहे. नागपुरमध्ये ही भयानक घटना घडली आहे. यामुळे थंडीत शेकोटी पेटवताना काळजी घ्या.
अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सध्या राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी शेकोट्या(bonfire ) पेटवल्या जात आहेत. मात्र, याच शेकोटीने एकाचा जीव घेतला आहे. नागपुरमध्ये(Nagpur ) ही भयानक घटना घडली आहे. यामुळे थंडीत शेकोटी पेटवताना काळजी घ्या.
संध्याकाळच्या थंडीत शेक घेण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीने भाजल्यामुळे एका 68 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. लीलाबाई झोडापे असे मृत महिलेचे नाव आहे. लीलाबाई या नागपुरातील मेहेरबाबा नगरात राहत होत्या.
23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी शेकोटी शेकत असताना लिलाबाईंच्या कपड्यांनी पेट घेतला होता. यात त्या 50% पेक्षा जास्त भाजल्या गेल्या. कुटुंब आणि शेजाऱ्यांनी लगेच आग विझवत लिलाबाईंना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तीन दिवस मृत्यूची झुंज दिल्यानंतर शनिवारी लिलाबाई यांचा मृत्यू झाला.
लिलाबाई यांच्या घराच्या पाठीमागच्या अंगणात वडाचा मोठा झाड असून त्यातून पडणारा पालापाचोळा त्या नेहमीच जमा करून जाळत होत्या. थंडीचे दिवस असल्यामुळे संध्याकाळच्या सुमारास जाळलेल्या पालापाचोळ्या पासून शेक घ्यावं या उद्दिष्टाने लिलाबाई पेटलेल्या शेकोटीच्या बाजूला उभ्या होत्या आणि तेव्हाच त्यांच्या कपड्यांनी पेट घेतला आणि भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला.