ठाणे : ठाण्यात मोबाईल चोरांमुळे रिक्षातून जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही महिला रिक्षाने जात असताना तिच्या हातातला मोबाईल खेचण्याचा प्रयत्न चोरांनी केला. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी हा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी मोबाईल वाचवताना महिला चालत्या रिक्षातून खाली पडली, या महिलेला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं पण तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. ठाण्यातील पूर्वद्रुत गतीमार्गावर ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ठाण्यात पोलिसांनी याविषयी कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे. ठाण्यात महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा समोर आलं आहे.


मुंबईतील कलिना परिसरात राहणारी २७ वर्षाच्या कन्मिला रायसिंग यांचा मोबाईल चोरट्यांनी खेचला, प्रतिकार करताना त्या खाली पडल्या आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्या मूळच्या मणिपूरच्या होत्या. या सर्व मैत्रीणी पूर्व द्रुतगती महामार्गावर मॉलमध्ये कामाला आहेत. तीन हात नाका परिसरात त्यांनी रिक्षा पकडल्यानंतर काही अंतरावर पुढे आल्यावर रिक्षामागे हे दोन्ही चोरटे आले होते.


कन्मिला यांच्या मोबाईलची किंमत अंदाजाने १० हजार रुपये असल्याची सांगण्यात येत आहे. या प्रकरणी चोरट्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.