सातारा : राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर बच्चू कडू हे अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा नेता अशी ओळख असलेले बच्चू कडू आता प्रशासनात राहूनही अधिकाऱ्यांवर जरब बसवताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांकडून कामाची फाईल थांबली तर त्या अधिकाऱ्याची सर्व्हिस थांबेल, अशा शब्दात महिला आणि बाल कल्याण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना इशारा धरला. साताऱ्यातील जिल्हा परिषदेत विभागाची बैठक घेतली. बैठकीनंतर बच्चू कडू यांनी पत्रकारांशी चर्चा केली.


अधिकाऱ्यांवर कारवाई 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

७ दिवसांच्यावर जर तक्रारीची फाईल थांबली तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात मला कायदेशीर कारवाई करण्यापासून अडवणारा कोणी तयार झाला नाही. माझं मंत्रिपद जाईल पण लोकांना मदत करण्यासाठी कोणी आडवे येत असेल तर त्याला मी खपवून घेणार नाही, असा दम बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना भरला आहे.



रक्तदानानंतर पदभार


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळयासमोर रक्तदान केलं. हे रक्त थँलेसेमिया रुग्णांना दिले जाणार आहेत. आता तर हातात दंडुका आला असल्यानं तीच आक्रमकता कायम राहिल, परंतु कायदेशीर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.


महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये अपक्ष आमदार बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद मिळालं. बच्चू कडू हे अपंग आणि रुग्णांच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवतात. काही दिवसांपू़र्वी अपंग आणि रुग्ण यांना सोईचे होईल अशा प्रकारचे मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर कार्यालय आणि शेजारील बंगल्याची मागणी केली होती. पण त्यांना ते मिळाले नाही. यावर त्यांनी अधिकाऱ्यांवर आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे.