महिला दिनीच स्वप्न झालं बेचिराख, महिला बचत गटाच्या हॉटेलला लावली आग
मोठ्या आशेने आणि हिमतीने या महिलांनी हॉटेल उभं केलं होतं, पण ...
प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : आज जागतिक महिला दिन. महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. आज प्रत्येक राजकारणापासून खेळापर्यंत आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. महिलांच्या कामाची दखल आता सर्व पातळीवर घेतली जात आहे.
महिला दिनाचा आनंद साजरा होत असतानाच वसईत मात्र महिलांचं स्वप्न बेचिराख झालं आहे. जागतिक महिला दिनीच महिलांच्या आनंदावर विरजन पडलं आहे.
वसईत नेमकं काय घडलं?
वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर 20 ते 25 महिलांच्या बचत गटाने फॅमिली कट्टा नावाचं हॉटेल सुरु केलं होतं. पै पै जमा करुन, कोणी सोनं गहाण ठेवून या महिलांनी मोठ्या हिमतीने हॉटेल सुरु केलं. मेहनतीच्या जोरावर या हॉटेलचं नावलौकिकही झालं होतं. पण नेमकी हीच गोष्ट काहींना खूपत असावी.
काल रात्री अंधाराचा फायदा घेत काही अज्ञातांनी हॉटेलचा दरवाजा तोडून हॉटेलला आग लावली. यात हॉटेलमधलं लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं आहे. डोळ्यादेखत आपलं स्वप्न बेचिराख झाल्याने या महिला पूरत्या मोडून पडल्यात. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.