बिबट्याचा हल्ला : महिलेचा मृतदेह तीन तासानंतर उचलला
जिल्ह्यातील चाळीसगाव इथं बिबट्यानं ठार केलेल्या महिलेचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी तीन तासांनंतर उचलला.
जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव इथं बिबट्यानं ठार केलेल्या महिलेचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी तीन तासांनंतर उचलला.
बिबट्यानं शेतात कपाशी वेचणाऱ्या दीपाली जगताप या महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्यानं संतप्त नातेवाईकांनी बिबट्याला पकडावं या मागणीसाठी तिचा मृतदेह पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवला होता.
उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र नातेवाईकांनी त्यांनाही पिटाळून लावलंय. गेल्या आठ दिवसापासून सायगाव, उंबरखेडे, वरखेडे, पिलखोड परिसरात सातत्यानं बिबटा नागरिकांना दिसत असून यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय.
यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात उंबरखेडे इथं एक महिला आणि अकरा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. सायगाव इथं शेतात काम करणा-या दोन महिलाही बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यात बिबट्यानं चौघांचा बळी घेतलाय. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अद्यापपर्यंत अपयश आलं आहे.