नवी मुंबई भरदिवसा महिलेचे कारसह अपहरण, गोळी झाडून केली हत्या
बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (५०) यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या केली.
नवी मुंबई : (Navi mumbai) बँकेत गेलेल्या पतीची वाट पाहत कारमध्ये बसलेल्या प्रभावती भगत (५०) यांची अज्ञात मारेकऱ्याने हत्या (women murder) केली. त्या गाडीत बसल्या होत्या. यावेळी मारेकऱ्याने त्यांचे कारसह अपहरण केले. कारसह पळवून नेऊन त्यांच्यावर रिव्हॉल्वरने गोळी झाडून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी भरदुपारी उलवे येथे घडली. या हत्येच्या घटनेनंतर प्रभावती भगत यांच्याजवळ असलेले दागिने लुटले गेले नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रभावती भगत यांना मारण्यामागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, या घटनेतील मारेकरी सापडल्यानंतरच या हत्येमागचे कारण स्पष्ट होणार असल्याचे परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. उरणच्या शेलघर भागात रहाणारे बाळकृष्ण भगत हे सोमवारी दुपारी आपली पत्नी प्रभावती भगत यांच्यासह कारने उलवे सेक्टर-१९ मधील बँक ऑफ महाराष्ट्र येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी बाळकृष्ण भगत यांनी आपली कार बँक समोरच उभी करुन पत्नी प्रभावती यांना कारमध्ये बसवून ते एकेटच बँकेत गेले होते.
यावेळी बाळकृष्ण यांनी कारची एसी सुरु रहावी यासाठी कार सुरुच ठेवली होती. यावेळी प्रभावती या कारमध्ये त्यांची पत्नी एकट्याच होत्या. अज्ञात व्यक्तीने अचनाक त्यांच्या कारमध्ये प्रवेश केला. भगत यांची कार वहाळच्या दिशेने पळवून नेली. यावेळी मारेकऱ्यासोबत प्रभावाती यांची झटापट झाल्याने मारेकऱ्याने आपल्याकडील रिव्हॉल्वरने प्रभावती भगत यांच्या छातीवर एक गोळी झाडली.
त्यानंतर त्याने कार वहाळ गावाजवळील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या पाठीमागील बाजूस सोडून पलायन केले. हा प्रकार बाजुच्या बांधकाम साईटवरील कामगारांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रभावती भगत यांना बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी पोलिसांनी या घटनेतील मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. याबाबत पोलिसांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.
0