प्रफुल्‍ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात उमेदवारांचं भवितव्य महिला मतदार ठरवणार आहेत. अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष महिला मतदारांची मत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. महिला मतदारांना या तीन मतदार संघात एवढं महत्त्व का प्राप्त झालं आहे? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड हा देशाची आर्थिक राजधानी मुंबईला लागून असलेला असा जिल्‍हा आहे. नोकरी व्‍यवसायासाठी इथली तरुण आणि पुरूषमंडळी मुंबईकडे धाव घेतात. त्‍यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महिला मतदारांना विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कारण या महिला आता रायगड जिल्ह्यातील उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत. 


रायगड जिल्‍हयातील सातपैकी अलिबाग, महाड आणि श्रीवर्धन या तीन मतदार संघात पुरूषांच्‍या तुलनेत महिला मतदारांचं प्रमाण अधिक आहे. निवडणूक विभागानं नुकत्‍याच प्रसिद्ध केलेल्‍या मतदार यादीवरून ही बाब स्‍पष्‍ट झाली आहे. 


राजकीय पक्षांनी आता बचत गट, महिला मेळावे याद्वारे महिला मतदारांना आपआपल्या पक्षाकडे वळवण्याचा सपाटा लावला आहे. 


अलिबाग विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या ही १ लाख ४८ हजार ०४६ आहे. तर पुरुष मतदार संख्या ही 1 लाख 45 हजार 918 आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात महिला मतदार या   1 लाख 31 हजार 298 आहेत. तर पुरुष मतदार हे 1 लाख 25 हजार 965 आहेत. तर महाड विधानसभा मतदार संघात महिला मतदारांची संख्या ही महिला 1 लाख 42 हजार 51 आहे. तर पुरष मतदार 1 लाख 41 हजार 196 आहेत.


महिला मतदारांची ही संख्या लक्षात घेता आता राजकीय पक्षांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान या महिलांना भेडसावणाऱ्या समस्या कधी सुटणार हा प्रश्नच आहे. महिला मतदारांची ही वाढती संख्या या तीन मतदार संघात निर्णायक भूमिका बजावू शकतात. परंतु या महिला प्रत्यक्ष मतदानात कितपत सहभागी होतात यावरच सारं अवलंबून असेल.