Worli Hit And Run Case: वरळीत पुन्हा एकदा हिट अँड रन प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. वरळीत बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील व्यावसायिकाच्या गाडीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला आहे. विनोद लाड असं मृत तरुणाचे नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात हिट अँड रन प्रकरणांच्या घटनांत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच वरळीत असाच एक अपघात घडला होता. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला होता. तर, अपघातानंतर चालक फरार झाला होता. या प्रकरणी राज्यातून संताप व्यक्त होत असताना पुन्हा एकदा अशीच घटना वरळीत घडली आहे. वरळी सीफेस येथील  ए.जी. खान अब्दुल गफारखान रोडवर २० जुलै रोजी बीएमब्यल्यू कारने विनोदच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की विनोद खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विनोदवर नायरच्या अतिदक्षता रुग्णालयात उपचार सुरू होते. आठ दिवस विनोदची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर शनिवारी त्याची प्राणज्योत मालवली. 


मिळालेल्या माहितीनुसार, विनोदचा अपघात झाला  ती कार ठाण्यातील अत्तर व्यावसायिकाची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वरळी येथील फोर सीझन हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी ते वरळीमध्ये आले होते. अपघात घडला त्यावेळी व्यावसायिकाचा चालक किरण इंदुलकर मोटरगाडी चालवत होता, असे तक्रारीत म्हटले आहे. विनोदचा चुलत भाऊ किशोर लाड याच्या तक्रारीवरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


विनोद हा मुळचा मालवण येथील आहे. ठाण्यात ट्रान्सपोर्ट कंपनीत पर्यवेक्षक पदावर तो कामाला होता. सध्या तो हिल रोड येथे त्याच्या चुलत बहिणीकडे राहत होता. विनोदच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ज्याठिकाणी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला तिथून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे.