खाशाबा जाधवांच्या गावातही एक दंगल सुरु...
आर्वीत मुलींची कुस्तीत दमदार कामगिरी झालेय. अभिनेताआमिर खानच्या दंगल सिनेमानंतर मुली लाल मातीतल्या कुस्तीचे धडे गिरवत आहेत. २२ मुलींनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बाजी मारलेय.
विकास भोसले, सातारा : आर्वीत मुलींची कुस्तीत दमदार कामगिरी झालेय. अभिनेताआमिर खानच्या दंगल सिनेमानंतर मुली लाल मातीतल्या कुस्तीचे धडे गिरवत आहेत. २२ मुलींनी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर बाजी मारलेय.
आमिर खानचा दंगल आला. हे बरंच झालं. या दंगलनं गावोगावी दंगल घडवली. खाशाबा जाधवांच्या सातारा जिल्ह्यातल्या आर्वी गावातही अशीच एक दंगल सुरु आहे.
आमिर खाननं गीता-बबिताची दंगल चंदेरी पडद्यावर आणली आणि खरोखरच गावोगावी दंगल सुरू झाली. देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं त्या खाशाबा जाधवांचं हे सातारा. लाल मातीतल्या कुस्तीची परंपरा जपणारा हा जिल्हा.
सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातलं आर्वी गाव स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. पण दंगल सिनेमानंतर या गावचं चित्र बदललं. पूर्वी फक्त पुरूषांची कुस्ती गावात रंगायची. आता मुलींच्या कुस्तीच्या स्पर्धा रंगतात. आर्वी परिसरातल्या मुलींनीही कुस्तीच्या या परंपरेला साजेशी कामगिरी केलीय. कुस्तीमध्ये राज्यपातळीवर २२ मुलींनी धाकड कामगिरी करत आर्वीचं नाव उंचावलंय.
या सगळ्या मुली त्यांची शाळा, अभ्यास सांभाळून कुस्तीची तालीम करत आहेत. सरावासाठी गावात मॅट उपलब्ध नाही, त्यामुळे या सगळ्या जणी पहाटे पाच वाजता उठून आर्वीपासून १५ किलोमीटर दूर रहिमतपूरमध्ये जाऊन मॅटवर सराव करतात.
लाल मातीतल्या कुस्तीची पुरुषी मक्तेदारी मोडत काढणं आर्वीतल्या मुलींसाठी सोपं नव्हतं. पण आमिरच्या दंगलमुळे त्यांना मोठी मदत झाली. महत्त्वाचं म्हणजे मुलीही गावच्या लौकिकाला जागल्या. आता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं त्यांना थोडी मदत केली तर आर्वीतूनही गीता-बबिता तयार होतील.