नाशिक शहरात सर्वच परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी काम पूर्ण झाल्यानंतरही खड्डे बुजविले जात नाहीये. याच खड्ड्यात पडून नाशिकरोड परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक रोड भागात गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर स्टार प्लस मार्केट जवळ गेल्या पंधरा दिवसांपासून रस्ता खोदलेला आहे. मात्र अद्याप हा खड्डा बुजवलेला नाही. या खड्डयान सोमवारी (दि.23 मे) मोबिन गफ्फार मणियार वय 32 वर्ष या दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला.


काय आहे घटना


मध्यभागी रस्ते खोदलेले असल्याने परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसून येते. यामुळे वाहनचालक विरुद्ध दिशेने आपले वाहन काढत असतो. असाच प्रकार मणियार यांच्या सोबत घडला.


मोबिन मणियार सोमवारी सकाळी आठ वाजता देवळाली गावाकडून चितेगाव कडे जात होते. महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर खोदकाम केलेले असल्याने एक दुचाकीस्वार मणियार यांच्या कडे विरुद्ध दिशेने आला.


विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची मणियार याना धडक लागल्याने ते खाली पडले. जवळच गॅस पाईपलाईन साठी खोदून ठेवलेल्या रस्त्यावर मोठमोठे दगड होते. या दगडावर मणियार यांचं डोकं आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि लहान मुलगा व मुलगी आहे.


नागरिकांची मागणी


एक महिन्यावर पावसाळा आला आहे. नाशिक शहरात रस्त्याच्या मधोमध खोद काम केले आहे. काही ठिकाणी साधी माती टाकून हे खड्डे बुजविले जात आहेत तर काही ठिकाणी जसेच्या तसेच आहेत. यामुळे पावसाळ्यात माती रस्त्यावर येऊन अधिक अपघात होण्याची दाट शक्यता आहे . रस्त्यांची परिस्थिती पाहता पावसापूर्वी रस्ते व्यवस्थित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे


विक्रमी अपघात


नाशिक जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक वाहन अपघातांची नोंद झालीये त्यात अशा पायाभूत सुविधा अधिक घातक आणि जीवघेण्या ठरत आहेत. शहरात पावसाळयात लवकर दुरुस्ती करण्यात आली नाही तर येत्या काळात सर्वसामान्यांचे अजूनही जीव जाऊ शकतात