अमरावती : अमरावतीला बदनाम करण्याचा कट काही जणांनी केला, पण तो कट आम्ही उधळला. आता अमरावती येथील परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचलपूरमध्ये झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून अचलपूर परतवाडा व कांडली परिसरात कलम 144 अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली.


अचलपूरमध्ये झालेलया या घटनेला भाजप शहर अध्यक्ष अभय माथने जबाबदार आहेत. त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. रोजगार, महागाई या गोष्टींवर पडदा टाकायचा आहे म्हणून भाजपा हे करत आहे, असा आरोप त्यांनी केला.


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यासमोर हनुमान चालीसा याचे पठण करण्याच्या इशारा त्यांनी दिलाय. पण, त्या भाजपासमोर लोटांगण घालत आहेत, असे त्या म्हणाल्या.


स्वतःचा TRP वाढविण्यासाठी खासदार नवनीत राणा मुख्यमंत्र्यांचं नाव घेतात. पब्लिसिटीसाठी काहीही स्टंट करतात. अमरावतीचं नाव त्या खराब करत आहेत. नवनीत राणा यांनी संसदीय फ्रॉड केला आहे म्हणून त्या भाजपासमोर लोटांगण घालत आहेत असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. तसेच, नागरिकांनी अफवांना बळी पडून नये असं आवाहनही त्यांनी केलं.