मकरंद घोडके, झी मीडिया, अहमदनगर : भटक्यांची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र मढी इथ कानिफनाथांचा जयघोष करत प्रथेप्रमाणे मानाची गोपाळ समाजाची होळी गुरुवारी सायंकाळी मढी इथं पेटविण्यात आली... तर सकाळी नाथमंदिराच्या कळसाला कैकाडी समाजाची मानाची काठी लावून खऱ्या अर्थाने मढी यात्रेला प्रारंभ झाला. होळी ते गुढीपाडवा अशा यात्रोत्सवाला तब्बल साडे चारशे वर्षांची परंपरा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवनाथांपैकी एक असलेल्या कानिफनाथांनी मढी इथं संजीवन समाधी घेतली, असं मानलं जातं. कानिफनाथांच्या यात्रोत्सवाला सुरवात करताना होळीच्या दिवशी मढी येथील मानाची होळी पेटविण्याचा मान हा गोपाळ समाजाला देण्यात आलाय. 


विश्वस्तांनी मानकऱ्यांना मानाच्या गोवऱ्या दिल्या. या गोवऱ्या डोक्यावर घेऊन वाजत-गाजत मंदिराच्या पायथ्याला जेथे होळी पेटविली जाते तेथे आणल्यानंतर होळी पेटविण्यात येते.


मढीच्या या यात्रेत होलिकोत्सवात गोपाळ बांधवाचा असलेला नाथघोष या उत्सवाचे वेगळेपण सांगते. त्याचप्रमाणे समाज जुन्या अनिष्ट प्रथांचा त्याग करुन नव्या बदलाना सामोरा जातोय. 


देशभर होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना मढीच्या यात्रेला प्रारंभ होतो आणि मढी गावची होळी १५ दिवस आधी पेटते. कारण गावात गोपाळ समाजाची होळी हीच होळी असते. इथे गाढवांचा बाजारदेखील भरतो आणि गुढी पाड्व्यापर्यंत इथे विविध कार्यक्रम इथे पार पडतात.