श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : घरीच हेलिकॉप्टर तयार करण्याचं स्वप्न बाळगणा-या एका ध्येयवेड्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. यवतमाळच्या फुलसावंगी गावात ही घटना घडली आहे. शेख इस्माईल असं या तरुणाचं नाव आहे. तो पेशानं पत्रा कारागीर होता. लहानपणापासून बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरतंय असं वाटत असताना ते स्वप्न क्षणातच होत्याच नव्हतं झालं. या अपघाताचा LIVE VIDEO समोर आला आहे. हा व्हिडीओ बघून तुमच्या अंगावर काटा उभा राहिलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 2 वर्षांपासून तो स्वतःच्या कल्पनेच्या आधारे हेलिकॉप्टर तयार करत होता. आठवी शिकलेल्या इस्माईलनं घरातल्या कारखान्यात हेलिकॉप्टर तयारही केलं. मुन्ना असं त्याच्या हेलिकॉप्टरचं नाव होतं.  मात्र त्याची चाचणी घेताना हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि तो मुख्य फॅनला धडकून तरुणाच्या डोक्याला लागला. यात गंभीर जखमी झालेल्या इस्माईलचा मृत्यू झाला. अंगावर काटा आणणारी अशी ही दृश्यं आहेत. (स्वतः बनविलेल्या हेलिकॉप्टरला उडवण्याचा प्रयत्न रँचोच्या जीवावर बेतला)


फुलसावंगी या लहानश्या गावातील शेख इस्माईलने लहानपणी खेळण्यातले हेलीकॉप्टर उडवित असताना आपणही एक दिवस स्वतः पायलट बनून स्वत:च्या  हेलीकॉप्टरने जगाची सफर करण्याचे स्वप्न रंगविले होते. आकाशात भरारी घेण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी मेक इन इंडियाअंतर्गत त्याने प्रयत्न सुरु केलेत.आठव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतलेला इस्माईल हा  वेल्डिंग आणि फेब्रिकेन पत्रकारागिर असल्याने तो घरच्या कारखान्यात अलमारी, कुलर अशी उपकरणे बनवायचा. तर त्याचा भाऊ वेल्डर आहे.



कुटुंबातील या व्यवसायातून वेळ काढून इस्माईल ने स्वतःच मॅनुफॅक्चर केलेल्या पार्टद्वारे हेलिकॉप्टर तयार करणे सुरू केले.घरीच स्वदेशी बनावटीचे हेलिकॉप्टर बनविण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून खूप मेहनत घेत होता.आपण बनविलेले हेलिकॉप्टर हवेत घिरट्या  घालू शकते असा विश्वास त्याला होता. 15 ऑगस्ट  इस्माईल आपल्या 'मुन्ना हेलीकॉप्टर' च्या उडानाचे प्रात्यक्षिक सादर करणार होता. मात्र तत्पूर्वीची चाचणी घेण्यासाठी काल रात्रीच्या सुमारास त्याने हेलिकॉप्टर सुरू केले, जमिनीवर सुरू केलेले इंजिन 750 अम्पियरवर फिरत होते.


दरम्यान अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला, तुटलेला फॅन मुख्य फॅनला येऊन धडकला आणि तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला. यात इस्माईल गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वतः हेलीकॉप्टर निर्मिती करण्याच्या स्वप्नाला पूर्पंत्वास नेण्यासाठी इस्माईल ने आपल्या पंखाना बळ दिले होते, मात्र साकारलेल्या हेलीकॉप्टर च्या पंखांनी त्याची स्वप्नपूर्ती होण्यापूर्वीच त्याचा घात केला. या ध्येयवेड्या तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.