`पैसे दे नाहीतर....` धक्कादायक | अल्पवयीन मुलाकडून बापालाच धमकी
मोबाईलच्या आहारी गेलेल्या अल्पवयीन मुलाची बापालाच धमकी, मागितली मोठी खंडणी
श्रीकांत राऊत, झी 24 तास, यवतमाळ : सोशल मीडियावर दिवसेंदिवस फसवणूक आणि त्यातून गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसत आहे. ही गुन्हेगारीची किड आता घरापर्यंत पोहोचली आहे. चक्क अल्पवयीन मुलानेच आपल्या वडिलांना सोशल मीडियाचा चुकीचा वापर करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
फेक फेसबुक आयडी तयार करून अल्पवयीन मुलाने वडिलांनाच धमकवल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. नुसती धमकीच नाही तर खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णीत उघडकीस आला.
चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून वडिलांनी मुलाला नागपूरला शिकायला पाठवावे असा या मुलाने तगादा लावला. यामागचं खरं कारण शिक्षण नसून मोबाईलवर मनसोक्त फ्री फायर गेम खेळता यावा हे होतं, असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. यवतमाळ पोलिसांच्या सायबर सेलने हा आव्हानात्मक तपास पूर्ण केला.
घडलं असं की व्यवसायिक असलेल्या या व्यक्तीला अज्ञात फेसबुक आयडीवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कुटुंबातील इतर सदस्यांना देखील फेसबुक स्टेटस, मेसेंजर द्वारे अशा धमक्या येऊ लागल्याने सारेच दहशतीत आले होते.
एक लाख रुपयाची खंडणी द्या नाहीतर मुलाला आणि कुटुंबाला आयुष्यातून उठवू अशी धमकी ज्यावेळी देण्यात आली तेव्हा पीडित व्यवसायिक घाबरले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तातडीनं अज्ञाताविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
तपासानंतर आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून पोटचा मुलगाच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हे सत्य समजल्याने पीडित व्यावसायिक आणि कुटुंबातील लोक हैराण झाले.
या मुलाला मोबाईल गेम खेळण्याचं व्यसन होतं, सकाळी उठल्यापासून तो मोबाईलवर गेम खेळत राहायचा. फ्री फायर गेम रिचार्जसाठी घरून पैसे मिळत नसल्याने मुलाने नागपूर येथे शिक्षणासाठी जाण्याचा आग्रह वडिलांकडे धरला. मात्र कुटुंबातील इतर सदस्य त्यासाठी तयार नव्हते.
या सगळ्यांना धाक दाखवण्यासाठी मुलाने हा प्लान तयार केला. फेक फेसबुक आयडीवरून वडिलांना धमक्या देणे सुरू केले. खंडणीच्या पैशांमधून गेमचा रिचार्ज करता येईल असा त्याचा मनसूबा होता. मात्र या सगळ्यात तो अपयशी ठरला आणि पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. हा सगळा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले.
लहान शाळकरी मुलांकडून मोबाईलचा अतिवापर धोकादायक ठरू लागल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शाळकरी मुलांमध्ये मोबाईल व समाज माध्यमांची मोठी क्रेझ आहे. प्रत्येक मुलाला मोबाईल लागतोच. त्याचा वापर अशा पद्धतीने होत असेल तर पालकांनी सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं पोलिसांनी सांगितलं.