श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : सावकारीच्या (illegal moneylender) वादातून गृहरक्षक दलातील जवानाची (home guard) गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतामाळच्या (Yavatmal Crime) पांढरकवडा भागात घडलाय. या प्रकरणी यवतमाळ पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. या हत्येनंतर भोसा परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलीस (Yavatmal Police) तपासात होमगार्डच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावरील कार वॉशिंग सेंटरमध्ये हा सगळा थरार घडला. अक्षय सतीश कैथवास (31, रा. भोसा रोड, यवतमाळ), असे मृताचे नाव आहे. अक्षय कैथवासवर रिव्हॉल्वर मधून गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली आहे. अक्षय रात्री कार वॉशिंग सेंटरमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा पैशावरून एकासोबत वाद झाला. यातूनच दोघांनी अक्षयवर हल्ला केला. तितक्यात अक्षयने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी अक्षयला पकडून त्याच्या डोक्यात व कपाळावर गोळ्या झाडल्या. अक्षयवर हल्ला होतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. संवेदनशील भागात घटना घडल्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तिथे तैनात केला होता. अवैध सावकारीच्या वादातून ही झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अक्षयच्या आईने घेतलेले कर्ज व त्यावरील व्याज यातून हा वाद होता. याप्रकरणी महिला सावकार हसीना खान उर्फ लक्ष्मी लिल्हारे, अजीज दुंगे, सोपान लिल्हारे, शरीफ खान यांच्यासह सात जणांविरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.


हत्या करणाऱ्यांशी मृत अक्षय आणि त्याच्या आईची ओळख होती. यातील मुख्य आरोपी हासिनाकडून काही पैसे अक्षयच्या आईने व्याजाने घेतले होते. पैसे परत केल्यानंतरही आरोपी हासिना अक्षयच्या आईकडून अतिरिक्त पैसे मागत होती. मात्र ते देण्यास फिर्यादीने नकार दिला होता. यावरुन हासिनाने अक्षय आणि त्याच्या आईला धमकावले होते. त्यानंतर शनिवारी पांढरकवडा रोडवरील रॉयल आर. एस. कार केअर वॉशिंग सेंटरमध्ये अक्षयची हत्या करण्यात आली.


"यवतमाळमध्ये अक्षय कैथवास या तरुणाचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. या प्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली आहे. आरोपीचा व्याजाचा धंदा असल्याचे समोर आले आहे," अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी दिली.