श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या वणी येथील रितिक घनश्याम पावडे या विद्यार्थ्याचे सध्या सर्वजण तोंडभरून कौतूक करत आहेत. यामागचे कारणही तसेच आहे. तो बारावीला चांगल्या गुणांनी पास झालाय. त्याही पेक्षा त्याने दुर्धर अशा आजारावर मात करत हे यश मिळवले आहे. म्हणून घनश्याम हा इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा ठरतो. घनश्याम हा मस्क्युलर डिस्ट्रॉफी या असाध्य आणि दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. असे असताना देखील बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. दहावीत ६५ टक्के तर बारावीत ६९ टक्के गुण मिळवून त्याने त्याची जिद्द दाखविली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हजारो मुलांमध्ये एकाला मस्क्युलर डिस्ट्रोफी हा आजार जडतो. या जनुकीय आजारात संपूर्ण शरीरातील स्नायूंच्या पेशी आणि तंतू चेतनाहीन होत जातात. ज्याचा परिणाम सर्वप्रथम पायांवर होतो. नंतर हात निकामी होऊन उठणे-बसणेही अशक्य होते. त्यामुळे अशा मुलांचे शिक्षण दुरापास्त असते. रितिक देखील चालू शकत नाही. त्याचे हात आणि पाय काम करीत नाही. कायम त्याला व्हीलचेअर चा आधार घ्यावा लागतो. ही अवस्था असूनही त्याने जिद्दीने बारावीची परीक्षा दिली. 



आजारामुळे रितिक शाळेत जाऊ शकला नव्हता. शिकवणी वर्ग तर नाहीच. मात्र त्याला शिक्षणाची गोडी आहे, खूप शिकायचं अशी खूणगाठ मनाशी बांधून त्याने घरीच मन लावून अभ्यास केला. परीक्षेच्या वेळी व्हीलचेअर द्वारे तो परीक्षा केंद्रावर पोहोचाचायचा अशा खडतर मार्गातून वाट काढत त्याने  शालांत परीक्षेप्रमाणेच बारावी तही घवघवीत यश मिळवले. भविष्यात त्याला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा असून त्याला संगणकाची देखील आवड आहे.