श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या पांढरकवडा नगरपरिषदेसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ डिसेंबरला याठिकाणी नगराध्यक्षांसह १९ जागांसाठी निवडणूक होतेय. याठिकाणी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि प्रहार जनशक्ती पक्षात चौरंगी लढत होतेय. 
नगराध्यक्षांसह १९ सदस्य पदासाठी निवडणूक निवडणूक होत आहे.  गेल्या १० वर्षांपासून याठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळं सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान काँग्रेसपुढं असणार आहे. मात्र काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण लागल आहे. 


 काँग्रेसचा एक मोठा गट प्रहार जनशक्तीमध्ये सामील झाल्यानं पहिल्यांदाच मोठ्या ताकदीनं प्रहार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. विशेष म्हणजे काँग्रेसला एका वॉर्डात तर उमेदवारही मिळालेला नाही. माजी मंत्री शिवाजी मोघेंची प्रतिष्ठा याठिकाणी पणाला लागली आहे. 


गेल्या निवडणुकीत एकही जागा न मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेनं आयात उमेदवारांच्या जोरावर निवडणुकीत उडी घेतली आहे.  त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटलाय. केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या पसंतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पक्षानं ऐनवेळी खो दिला आणि शेतकरी नेते किशोर तिवारी यांची पुतणी आणि माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी यांची कन्या श्रद्धा तिवारी यांना तिकीट दिलं. 


आमदार तोडसाम यांना कंत्राटदाराला खंडणी मागितल्याची वादग्रस्त क्लिप प्रकरण महागात पडल्यानं त्यांची छुपी नाराजी आहे. भाजपाचे दुसरे नेते माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर ह्यांनी देखील आपला छुपा पाठिंबा शिवसेनेच्या उमेदवार राधिका बोरेलेंना दिला आहे. त्यामुळे हंसराज अहिरांची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे. महसूलराज्यमंत्री संजय राठोड यांचीही प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. चौरंगी लढतीत मंत्री माजी मंत्र्यांसह दिग्गजांना नाराजीचा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानं सामदाम लाऊन सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न सर्वपक्षीय करताहेत.