यवतमाळ : अटक वॉरंट घेऊन गेलेल्या पोलीस जमादारावर आरोपीने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याची घटना यवतमाळच्या मारेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत हिवरी गावात घडली आहे. राजू कुळमेथे असे हल्ल्यात ठार झालेल्या पोलीस जमादाराचे नाव असून या हल्ल्यात प्रमोद फुपरे आणि मधुकर मुके हे अन्य दोन पोलीस कर्मचारी देखील  जखमी झाले आहेत. आरोपी अनिल आत्राम याने लाकडी दांड्याने अटक वॉरंट घेऊन आलेल्या पोलिसांवर हल्ला चढविला.


आरोपी पसार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मारेगाव पोलीस ठाण्यात कार्यरत जमादार राजू कुळमेथे हे प्रमोद फुफरे व मधुकर मुके यांच्यासह हिवरी इथं समन्स अंमल करण्यासाठी रात्री गेले होते.


यावेळी घरी दडून बसलेल्या आरोपी अनिल आत्राम याने पोलीस बघताच बैलगाडीचा दंडुका घेऊन पथकावर हल्ला चढविला.


यात त्याने राजू कुळमेथेंच्या डोक्यात वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोघे पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हल्ला करून आरोपी पसार झाला आहे. 


सुरक्षेचा प्रश्न 


आरोपीने यापूर्वी देखील समन्स वॉरंट अंमल करायला आलेल्या पोलिसांवर हल्ला चढवून गुंगारा दिल्याची माहिती आहे.


या घटनेने पोलीस वर्तुळ हादरले असून पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.