यवतमाळ: मुसळधार पावसामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. एरवी पावसाळ्यात दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटण्याची बाब नित्याचीच आहे. यंदाही यवतमाळच्या वणी तालुक्यातील सवांगी गावावरही हीच परिस्थिती ओढावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सात दिवसांपासून संततधार पावसामुळे सावंगीचा जगाशी असलेला संपर्क तुटलाय. गावातील शाळा बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय, शेतकऱ्यांची शेतातील कामंही खोळंबली आहेत. गावाबाहेर पडायचं म्हणजे ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते. गेल्या कित्येक वर्षांपासून अशाच मरणयातना सवांगीतील ग्रामस्थांना भोगाव्या लागत आहेत. गेल्या सात  दिवसांपासून शाळेला अघोषित सुट्टी आहे. कारण शिक्षक शाळेत येऊ शकत नाही. उच्च प्राथमिक आणि पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावाबाहेर पडायला मार्ग नाही. आजारी व्यक्तीला योग्य वेळी उपचार मिळणेही जवळपास अशक्य झाले आहे.