श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार  (Ajit Pawar) हे सध्या पूरग्रस्त (Flood) भागांच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भात (Vidarbha) पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. शासनातर्फे मदतीचे आश्वासन देण्यात आलं असलं तरी अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या भेटीला अजित पवार हे थेट शेतात पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी बोलताना तात्काळ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं असल्याचे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यात पाहणी करत असताना एक पूरग्रस्त शेतकरी अजित पवार यांच्यासमोर ढसाढसा रडला. शेतकऱ्याची ही अवस्था पाहून उपस्थितांची मन हेलावून गेले.


पूरग्रस्त भागात पाहणी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांच्या समक्ष ढसाढसा रडून एका शेतकऱ्याने आपल्या वेदना त्यांच्यापुढे मांडल्या. मारेगाव तालुक्यातील दापोरा येथील गुरुदेव गणपत पचारे या हतबल शेतकऱ्याचा आक्रोश ऐकून अजित पवार देखील स्तब्ध झाले. 


गुरुदेव पचारे यांची नदीकाठावर 30 एकर शेती आहे. अतिवृष्टीसह पुरामुळे गुरुदेव पचारे यांची शेती पूर्णपणे खरडून गेली. त्यामुळे शेती पीक होत्याचे नव्हते झाले. शिवाय शेतात ठेवलेले 120 बॅग खत, गुरांचा चारा, पूरक उद्योग म्हणून सुरू केलेल्या कुक्कुटपालनातील एक हजार कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. यामुळे गुरुदेव पचारे हे पूर्णपणे कोलमडून गेले आहेत.



अजित पवार पाहणी करत असतानाच गुरुदेव पचारे यांना अश्रू अनावर झाले. आपल्यावर कोसळलेल्या संकटातून कसे सावरू असा प्रश्न विचारत हा शेतकरी ढसाढसा रडला. या शेतकऱ्याला जवळ घेऊन  खचू नको, संकटातून मार्ग काढू अशा संवेदना अजित पवार यांनी व्यक्त केल्या.