श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांचा पंतप्रधान झाल्यावर त्यांना विसर पडला. त्यामुळे व्यथित झालेला यवतमाळचा अवधूत गायकवाड हा तरुण सायकलवर "क्या हुवा तेरा वादा!" लिहिलेले फलक लाऊन मोदींच्या वडनगर गुजरातकडे निघाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकू असे सांगून पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींना अवधूत जनधन खात्याच्या पासबुकच्या झेरॉक्स सोपविणार आहे.


सायकलवरून प्रवास करणारा हा आहे यवतमाळच्या आर्णीचा अवधूत गायकवाड... तो यवतमाळच्या दाभडी गावातून गुजरातच्या वडनगरकडे निघालाय. दाभडी गावात मोदींनी पंतप्रधान बनण्यापूर्वी शेतकऱ्यांसह चाय पे चर्चा केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना अच्छे दिनचं स्वप्न दाखविणारं आमिष त्यांनी दिलं होतं. 


शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, फळभाजीपाल्यासाठी शीतगृह, कापूस ते कापड उद्योग आणि सोबतच देशाबाहेरील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र, ते केवळ आश्वासनच ठरलं. 


जनधन खात्यातही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे अवधूत गायकवाड गावागावांमधून जनधन खात्याच्या पासबूकच्या झेरॉक्स गोळा करुन मोदींकडे किंवा त्यांच्या आईकडे देणार असल्याचं सांगतोय.


अवधूत गायकवाड 'क्या हुवा तेरा वादा' असं लिहिलेल्या फलकावर मोदींचा फोटो सायकलवर लावून फिरतोय. त्यामुळे आपसूकच लोकांचं लक्ष वेधलं जातंय.


निवडणुकांपूर्वी राजकीय मंडळी आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र, त्यातली आश्वासनं अनेकदा पूर्ण होत नाहीत. त्यातूनच या तरुणानं ही सायकलवारी सुरू केलीय.



यवतमाळच्या अवधूत गायकवाडची सायकलवारी