चेतन कोळस, झी मीडिया, येवला : हातमागावरच्या अस्सल पैठणीसाठी येवला प्रसिद्ध आहे. पण कच्च्या मालाच्या वाढलेल्या भावामुळे पैठणीची उत्पादन किंमत वाढली आहे. याचा परिणाम कारागिरांना भोगावा लागला आहे. त्यात ग्राहकांचा कल सेमी पैठणीकडं वाढल्यानं हातमागावर पैठणी विणणारे कारागिर हवालदिल झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या समस्त महिलांना पैठणीवरचा नाचरा मोर शतकानुशतकांपासून भुरळ घालत आलाय. खिशाला थोडा भार पडला तरी चालेल पण पैठणीच घ्यायची असा महिलांचा आग्रह असतो. त्यामुळं आजही पैठणीचं माहेरघर असलेल्या येवल्यात लांबूनलांबून महिला ग्राहक येत असतात.


गेल्या काही दिवसांत रेशमाचे भाव वाढलेत. शिवाय पैठणीवर जीएसटीही लावण्यात आला आहे. त्यामुळं  पैठणी तयार करणे आणि विकणं महागलं आहे. पैठणीची उत्पादन किंमत वाढलीय. पण बाजारात भाव काही वाढलेले नाहीत.


साधारण याआधी रेशमाचे भाव छत्तीस शे पर्यंत होते. आता साधारण साडे तीनशे चारशे वाढून चार हजार पर्यंत गेलेले आहे. विणकरांना याचा मोठा फटका बसलेला आहे. त्या प्रमाणात साड्यांचे भाव काही वाढले नाही. त्यातच मशीनवर विणल्या जाणाऱ्या सेमी पैठणींना मोठी मागणी वाढलीय. याचा फटका हातमागावर अस्सल पैठणी विणणाऱ्या विणकरांना बसलाय.


कच्च्या मालाच्या किंमती अतिशय वाढलेले आहेत. तसेच सामने वाला लाईट बिल रेशीम वाला बेंगलोर वरुंजी रेशीम येतं कच्चामाल याच्यात चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली आहे. या जितका फायदा झाला पाहिजे तितका मिळत नाही. त्यामुळे घर चालवणे आता अवघड झाले आहे. तरी शासनाने या गोष्टींकडे लक्ष देऊन विचार करावा अशी विनंती कारागिरांकडून होत आहे.


सरकारनं पैठणी विणणाऱ्या कारागिरांसाठी काही केलं नाही तर कारागिरांना वाढत्या स्पर्धेत तग धरणं कठीण आहे. असंच सुरु राहिल्यास अस्सल पैठणी इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.