तरुणाने दिलं आईला अनोखं बर्थडे गिफ्ट, 50 व्या वाढदिवशी घडवली हवाई सफर
घरकामं करून मुलांना केलं मोठं, मुलाने केली हेलिकॉप्टरने फिरण्याची आईची इच्छा पूर्ण
चंद्रशेखर भूयार, झी मीडिया, उल्हासनगर : आईला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलानं चक्क हेलिकॉप्टरची हवाई सफर घडवली. अतिशय काबाडकष्ट करून आपल्याला लहानाचं मोठं केल. या ऋणातून उतराई होण्यासाठी उल्हासनगरच्या प्रदीप गरड या तरुणाने त्याच्या आईला हे अनोखं गिफ्ट दिलं आहे .
मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या रेखा दिलीप गरड या लग्न होऊन उल्हासनगरात आल्या. मात्र मुलं लहान असतानाच अचानक पती दिलीप गरड यांचं निधन झालं. यानंतर रेखा यांनी अतिशय कष्टाने तिनही मुलांना वाढवलं. मुलांच्या पालनपोषणासाठी रेखा यांनी लोकांच्या घरची घरकामं केली. मोठा मुलगा प्रदीप याला त्यांनी आश्रमशाळेत शिकवलं. तिथे प्रदीप यानेही अतिशय जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि चांगल्या नोकरीला लागला.
प्रदीप बारावीला असताना एक दिवस त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेलं. यावेळी आपल्याला कधी हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळेल? असं रेखा या सहज बोलून गेल्या. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला. लग्न झालं, दोन मुलं झाली, पण आईची 'ती' इच्छा कशी पूर्ण करावी? याची सल त्याला बोचत होती.
अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली. वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं. तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचं लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुलं यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला.
आईने खूप हालअपेष्टा सहन करून आपल्याला लहानाचं मोठं केलं. त्यामुळं तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी भाग्य असल्याचं प्रदीप कृतज्ञपणे सांगतो.