विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : एकावर एक मोफत अशा अनेक जाहीराती आपण नेहमीच पहात असतो. पण अशीच एक जाहीरात औरंगाबादमधल्या एका तरुणाला चांगली महागात पडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहरातील नारेगावमध्ये राहणाऱ्या बाबासाहेब ठोंबरे यांच्या मुलाला फेसबुकवर सर्फिंग करत एक जाहीरात दिसली. औरंगाबादच्या थाळीसाठी प्रसिद्ध अशा भोज थाळीची ती जाहीरात होती. एकावर एक थाळी मोफत असली जाहीरात असल्यानं त्या जाहीराताली हा तरुण भुलला आणि तिथं दिलेल्या नंबरवर कॉल करून थाळी बुक केली. 


इतकंच नाही तर या तरुणाने आपल्या वडिलांच्या क्रेडीट कार्डचे सर्व डिटेल्सही त्यांना दिले. इथेच हा तरुण फसला. अवघ्या सेकंदातच बाबासाहेब ठोंबरे यांच्या कार्डवर 90 हजार रुपये वळते झाले. विशेष म्हणजे घडलेला हा प्रकार मुलाने आपल्या वडिलांना सांगितला नाही. बँकेतून कॉल आल्यावर बाबासाहेब ठोंबरे यांना हा सर्व प्रकार कळला.



धक्कादायक म्हणजे या नंतरही भामट्यांचे फसवणूकीसाठी फोन सुरुच आहे. या सगळ्या फसवणूकीच्या प्रकारानंतर ठोंबरे कूटुबियांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि झालेल्या फसवणूकीची तक्रार दिली. पोलिसांनीही फसवणूकीची गुन्हा दाखल करत असल्या जाहीरातींना बळी पडू नका असं आवाहन केलं.


ज्या हॉटेलच्या नावाने ही जाहीरात देण्यात आली होती, ती फसवी होती, याआधीही या हॉटेलच्या नावाने अनेकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले होते. या जाहीराती कोण आणि कुठून देतं याचा पोलिसांनी छडा लावावा अशी मागणी हॉटेल मालकाने केली आहे.


सोशल मिडीयावर अशा अनेक फसव्या जाहीराती येत असतात. या फसव्या अमिषाला आपण भुलतो आणि बळी पड़तो. पण हे प्रकार टाळायचे असतील तर थोडी खबरदारी ही घ्यावीच लागेल.