लैलेश बारगजे, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात मध्यरात्री एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. वाढदिवसाची पार्टी सुरू असतानाच ही घटना घडली आहे. ओंकार उर्फ गामा पांडुरंग भागानगरे असं मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


अवैध धंद्याची माहिती दिल्यावरुन वार


ओंकार भागानगरे आणि त्याचे मित्र एका वाढदिवसाच्या पार्टीत होते. त्याचवेळी आरोपी तिथे आले आणि त्यांनी ओंकार व शुभम पाडोळे नावाच्या व्यक्तीवर तलवारीने सपासप वार केले. अचानक पार्टीत हल्लेखोर घुसल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. मित्र व नातेवाईकांनी ओंकार वर शुभमला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ओंकारने प्राण गमावले होते. अवैध धंद्याची माहिती पोलिसांकडे दिल्याच्या रागातून ओंकार व त्याच्या मित्रावर तलवारीने वार करण्यात आले. या हल्ल्यात शुभम पाडोळे हा गंभीर जखमी झाला आहे.


नगरमध्ये फिल्मी स्टाइल थरार


सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रस्त्यावर रूबाब कलेक्शन समोर ही घटना घडली आहे. दरम्यान, मध्यरात्री फिल्मी स्टाईल घडलेल्या घटनेमुळे नगर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात ओंकार घोलप यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या खुनातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी 3 वेगवेगळ्या पथकांची स्थापना करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. 


पोलिसांकडून तक्रार दाखल


पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गणेश हुच्चे याचे कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ओंकार भागानगरे याने पोलिसांकडे तक्रार केली होती. याचाच राग मनात ठेवून हा हल्ला करवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी गणेश हुच्चे, नंदु बोराटे आणि संदिप गुडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच, या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 


अंबरनाथमध्ये वृद्धाचा खून


अंबरनाथमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. एका वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समलिंगी संबंधांवरुनच वृद्धाच्या मित्रानेच ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे.