सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड : वाढत्या इंधनदरवाढीला एका युवा शेतकऱ्याने भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्या जुगाड करत बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केली आहे. हा युवा शेतकरी आहे कोण आणि त्याच्या या बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकीची नक्की काय कमाल आहे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेट्रोलवर होणारा रोजचा खर्च टाळण्यासाठी एका युवा शेतक-याने आपल्या कल्पकतेतून बॅटरी वर चालणारी दुचाकी बनवली. केवळ 14 रुपयांच्या खर्चात 100 किलोमिटर पर्यंत ही दुचाकी धावते. नांदेड जिल्ह्यातील महादेव पिंपळगाव येथील ज्ञानेश्वर कल्याणकर या युवा शेतक-याने देशी जुगाड करत बॅटरीवर चालणारी दुचाकी तयार केली. 


ज्ञानेश्वर फुलशेती करतो. दरोरोज त्याला 2 ते 3 वेळा नांदेडमधून यावं किंवा जावं लागतं. त्यामुळे पेट्रोल परवडत नाही असं त्याचं म्हणणं होतं. पेट्रोलचे भाव गगनाला भिडल्याने दोनशे ते तीनशे रुपये खर्च व्हायचा. त्यामुळे त्याने बॅटरी चालणारी दुचाकी बनवण्याचा निश्चय केला. 


आपल्या 20 वर्ष जुन्या दुचाकीत बदल करत 1.34 किलो व्हॅट आणि 48 व्होल्टची लिथियम बॅटरी लावली. चाक फिरवण्यासाठी 750 व्होल्ट, 48 व्हॅटची मोटर बसवण्यात आली. 4 तास चार्ज केल्यावर दुचाकी तब्बल 100 किलोमिटर धावते. चार्जिंग साठी केवळ 2 युनिट म्हणजे 14 रुपये खर्च होतो. ही दुचाकी बनवण्यासाठी 30 हजार रुपये खर्च आला आहे.


बॅटरीवर चालणारी ही दुचाकी जवळपास 300 किलो वजन सहज पेलवून नेऊ शकते हे त्याचं वैशिष्ट्य आहे. वाढत्या पेट्रोल दरवाढीला बॅटरीच्या बाईकचा आधार या युवा शेतकऱ्याला मिळाला आहे. या युवा शेतकऱ्याचं नांदेडसह आजूबाजूच्या गावातही खूप कौतुक केलं जात आहे.