शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : वडिलांचे छत्र हरवल्यानंतर हालाखीच्या परिस्थितीतून आईने तीन मुलींना शिकवलं. त्यापैकी रेणुका गुंडरे या विद्यार्थिनीने दहावीत ९४ टक्के गुण मिळवले. दुर्दैवाने निकालाच्या आदल्या दिवशीच तिच्या आईचा सर्पदंशाने मृत्यू झाला. काळीज पिळवटून टाकणारी ही बातमी झी २४ तासने दाखवली होती. याबातमीची दखल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली. त्यांनी रेणुका गुंडरेला आर्थिक मदत देऊन तिच्या शिक्षणाची जबाबदारीही घेतली आहे. तर अनेकांनी रेणुकाच्या अकाऊंटमध्येही लाखोंची मदत केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील होकर्णा गावातील रेणुका दिलीप गुंडरेने नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात तब्बल ९३.४० टक्के इतके गुण मिळवले. मात्र दुर्दैवाने निकालाच्या आदल्या दिवशीच तिची आई अनिता गुंडरे यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. 'आई आता मी हा निकाल कुणाला सांगू? बाबा तर नाहीतच, आता तू ही सोडून गेलीस' अशी आर्त किंकाळी रेणुकाने निकाला दिवशी फोडली होती. ही काळीज पिळवटून टाकणारी बातमी 'झी २४ तास'ने दाखवली होती. याची दखल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड घेतली आणि रेणुकाला मदतीचा हात देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे यांना पाठवलं. आर्थिक मदतीसह रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी आता उचलली आहे. यावेळी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्वतः रेणुकाशी फोनद्वारे संवाद साधून पुढील शिक्षणासाठी रेणुकाला आश्वस्त केलंय.  


अतिशय हालाखीच्या परिस्थतीत रेणुकाची आई तिन्ही मुलींना शिकवत होत्या. मात्र आई आणि वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही रक्ताचे आजी-आजोबा आणि चुलते रेणुकाच्या दुःखावर मायेची फुंकर घालण्यासाठीही आले नाहीत. मात्र थेट राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी भविष्यातील शिक्षणाची हमी घेतल्यामुळे रेणुकाच्या चुलत आजोबांनी आणि मावशीने आभार मानले. यावेळी मदत केलेल्या सर्वांचे आणि झी २४ तासचेही त्यांनी आभार मानले आहेत.


आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या रेणुका गुंडरेच्या बातमीचे संवेदनशील आणि जबाबदारीपूर्वक वार्तांकन करून 'झी २४ तास'ने रेणुकाला न्याय मिळवून दिल्याची भावना यावेळी होकर्णा ग्रामस्थामध्ये होती. लवकरच पुढील शिक्षणाची दिशा ठरवून रेणुका आईचे अधिकारी व्हायचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज होणार आहे.