मुंबई : MHADA Scam  : म्हाडाच्या रिडेव्हलपमेंट इमारतीत सुमारे 1200 कोटींचा घोटाळा झाल्याचे वृत्त 'झी 24 तास'ने दाखविल्यानंतर याची दखल राज्य सरकारने घेतली आहे. म्हाडाच्या 1200 कोटींचा घोटाळाप्रकरणाचा  'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MHADA Biggest Scam : गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी 'झी 24 तास'ने दाखविल्याने याचे मोठे पडसाद उमटले. म्हाडात रिडेव्हलपमेंट्च्या इमारतीतल्या घरांचा मोठा घोटाळा 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाला आहे. (Scam of Houses in MHADA Redevelopment Building) सुमारे 1200 कोटींचा हा घोटाळा असून यात म्हाडातल्या बाबूंना हाताशी धरून दलालांनी हजारो घरांवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. (MHADA  Home) आता राज्य सरकारच्यावतीने याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. 


म्हाडा माफियांचा डल्ला 


म्हाडाची हजारो घरं घुसखोरांनी लाटली. मेलेल्याला जिवंत दाखवून सर्रास घरं वाटली. अधिकारी आणि दलालांनी घोटाळ्याची दुकाने थाटली. मराठी माणसाच्या मुळावर म्हाडाचे अधिकारी उठल्याचे दिसून आलेत. या 'झी 24 तास' इन्व्हेस्टीगेशनमध्ये घोटाळेबाजांचा पर्दाफाश झाला. 


गृहनिर्माण खात्याला हादरवणारी बातमी, म्हाडाचा सर्वात मोठा घोटाळा


मुंबईतील मदनपुरातले शहादत बाबा. दोन वेळच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हातमजुरी करतात. मात्र त्यांचा फोटो सध्या सायनच्या प्रतीक्षानगरमधील म्हाडाच्या इमारत क्रमांक टी-40 च्या कागदपत्रावर झळकतो. त्यांचा त्या घराशी काहीतरी संबंध असेल. पण इथंच खरी गोम आहे. फोटो शहादत बाबाचा, नाव इसाक अलीचं आणि लाटलं तिसऱ्यानंच. हा सगळा प्रकार आहे तरी काय? याचा छडा लावण्यासाठीच आम्ही या शहादत बाबाला शोधून काढलं. यानंतर या बाबानं जे सांगितलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.



बाबा जे घर विकल्याचं सांगतोय ते आहे मदनपुऱ्यातले. मग प्रतीक्षानगरच्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या घराच्या कागदपत्रावर बाबाचा फोटो आला कसा? हेच शोधण्यासाठी आम्ही थेट प्रतीक्षा नगरमधल्या टी 40 इमारतीतल्या 212 नंबरच्या फ्लॅटवर धडक दिली. यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्ही चक्रावल्याशिवाय राहणार नाहीत. 


ना इथं शहादत बाबा राहातो. ना इसाक अली. या स्टोरीत आता निशांत नावाची तिसरी एण्ट्री झाली. मग आम्ही जेव्हा या घराची कुंडली काढली तेव्हा म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी मेलेल्या माणसाला जिवंत केल्याचा कारनामाच समोर आला. या घरासाठी इसाक अली नावाच्या व्यक्तीनं 2016 साली म्हाडाकडे घरासाठी अर्ज केल्याची नोंद आहे. मात्र उत्तर प्रदेशातले हे इसाक अली 2004 सालीच जग सोडून गेले. मग त्यांच्या नावानं अर्ज करून म्हाडाच्या अधिका-यांना हाताशी धरत या घरावर डल्ला मारणारा निशांत नावाचा घुसखोर कोण? एवढंच नव्हे तर 2016 मध्ये म्हाडाच्या कार्यालयात सुनावणीसाठी इसाक अली म्हणून हजेरी लावणारा तोतया कोण होता? कोणत्या अधिका-याच्या वरदहस्तानं इसाक अलीला कागदावर जिवंत करण्यात आलं? 


या सर्व प्रकारावर आम्ही म्हाडाच्या अधिकाऱ्यांना भेटलो, पण त्यांनी कॅमेरॅवर बोलायला नकार दिला. मात्र या प्रकणाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी खाजगीत सांगितले. तसेच असे म्हाडात तब्बल 12 हजार घुसखोर असल्याचंही अधिकारी खासगीत सांगत आहेत. म्हाडाचे अधिकारी, दलाल आणि बोगस लाभार्थ्यांच्या गोरखधंद्याचा भांडाफोड झाल्यानंतर दक्षता विभाग खडबडून जागं झालं आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र गेंड्यांची कातडी नसेल ती म्हाडाची यंत्रणा कसली ? ना गुन्हा दाखल झाला, ना कुठली चौकशी? 


कारण म्हाडातल्या बड्या अधिका-यांपासून छोट्या कर्मचा-यांपर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचाराच्या चिखलानं माखलेले आहेत.त्यामुळेच दलालांमार्फत हजारों घुसखोरांनी गरिबांच्या घरांवर डल्ला मारलाय. एवढंच नाही तर मृत व्यक्तीला जिवंत दाखवून मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाल्ल्याचा लज्जास्पद कारनामा म्हाडाचे अधिकारी आणि दलालांच्या अभद्र युतीनं केलाय.