दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमून विचार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. संख्यावाचनाचा घोळ मिटवायला सरकार समिती गठीत करणार आहे. बालभारतीकडून दुसरीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल करण्यात आला आहे. संख्या वाचन करताना एकवीस ऐवजी वीस एक, त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, त्र्याण्णव ऐवजी नव्वद तीन असं वाचन करण्यात येणार आहे. जोडाक्षर न वापरता असे संख्या वाचन करण्याचा पाठ गणिताच्या पुस्तकात दिला जाणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून दुसरीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला.  'झी 24 तास'ने या बातमीचा पाठपुरावा केला. त्यानंतर मराठी भाषाप्रेमींच्या तक्रारींची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संख्यावाचनाबाबत तज्ञ्जांची समितीने शिफारस केली होती. त्यानुसार हे अभ्यासक्रमात घेण्यात आले. ते केवळ वीस दोन असे नसून पुढे बावीसही लिहलेले आहे. त्यावर सभागृहाची तीव्र भावना असेल तर अधिक तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी आज स्पष्ट केले. बोलण्यात सुलभता यावी म्हणून संख्यावाचनाचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संख्या वाचनाच्या नव्या पद्धतीवर विरोधकांनी काल मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली होती. त्याचं उट्ट आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काढलं. बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकात असलेल्या वाक्यांची उदाहरणे देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चिमटे काढले. दादा कमळ बघं, छगन कमळ बघं, हसन झटकन उठ, शरद गवत आण अशी वाक्य मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचून दाखवली आणि सभागृहात एकच हशा पिकला. या उदाहरणाचा कोणत्याही सदस्यांशी संबंध नाही, असं सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.


नव्या संख्यावाचनावर टीका करताना अजित पवारांनी काल मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस हे नाव आता फडण वीस आणि शून्य असे म्हणायचे का असा सवाल करत अजित पवारांनी नव्या संख्यावाचनाच्या पद्धतीला विरोध केला होता. याबाबत आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री म्हणाले की, संख्यावाचनाबाबत तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. त्यांच्या शिफारशीनुसार पद्धत सोपी व्हावी म्हणून नव्या संख्यावाचाबाबत निर्णय घेण्यात आला. मात्र हे संख्यावाचन केवळ वीस दोन असे नसून पुढे बावीसही लिहलेले आहे. मात्र याबाबत सभागृहाच्या भावना तीव्र भावना लक्षात घेऊन अधिक तज्ज्ञांची समिती नेमून त्याबाबत विचार करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. 



विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ 


यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच हा बदल करण्यात आलाय. जोडाक्षर वाचताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होते आणि ते अधिक सोपं व्हाव यासाठी हा बदल करण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र असा अचानक आणि पहिलीऐवजी असा मधेच दुसरीत बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होणार आहे. मात्र असा बदल करण्याची काहीही गरज नव्हती असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. तर मुलांना संख्या उच्चारणं अधिक सोपं व्हावं त्यासाठी हा बदल सूचवण्यात आल्याचा दावा शिक्षणतज्ज्ञ मंगला नारळीकर यांनी सांगितले आहे.