`राऊत फटाके लावत असले तरीही त्यातील दारु उद्धव ठाकरेंचीच`
`संजय राऊत फटाके लावत असले तरी त्यातील दारु उद्धव ठाकरेंचीच असते`
मुंबई : संजय राऊत फटाके लावत असले तरी त्यातील दारु उद्धव ठाकरेंचीच असते असे विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. 'झी २४ तास'च्या रोखठोक या विशेष कार्यक्रमात कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या संजय राऊत जी वक्तव्य करत आहेत ती तुमची स्वत:ची आहेत ?, उद्धव ठाकरेंची आहे ? शिवसेना पक्षाची आहे ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा खुलासा केला.
संजय राऊत शिवसेना आणि उद्धव ठाकरे वेगळे नाहीत. दारू उद्धव ठाकरेंची मी केवळ वात लावतो. मी माझं पक्षातलं काम करतो असे ते यावेळी म्हणाले. प्रत्येक वेळी सेनापतीने युद्धावर जाऊन लढायचे नसते, आम्ही सरदार आहोत असेही ते म्हणाले. शिवसेनेची कार्यपद्धती ज्यांना माहितेय ते माझ्यावर प्रश्न उपस्थित करणार नाहीत असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांनी आज सकाळी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत राऊत यांनी 'लक्ष्य तक पहुचने से पहले सफर मे मजा आता है' असा संदेशही लिहला आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या या फोटोमागील नेमका अर्थ काय, याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने समसमान सत्तावाटपासाठी आग्रह धरला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यात अशी कोणतीही बोलणी झाली नव्हती, असे सांगत शिवसेनेची मागणी धुडकावून लावली होती. यानंतर शिवसेना कमालीची आक्रमक झाली. संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून पत्रकारपरिषद आणि ट्विट करण्याचा सपाटा लावला असून ते दररोज भाजपला नवनवे इशारे देत आहेत. कालच झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी शिवसेनेकडे १७० पेक्षा अधिक आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावरच शपथ घेईल, असेही राऊत यांनी म्हटले होते.