पुणे : Eknath Shinde Udyan : हडपसर येथील उद्यान नामकरण सोहळा रद्द करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता नसताना उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. मात्र,  हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केली होती. याबाबत 'झी 24 तास'ने वृत्त प्रसारित केले होते.  'झी 24 तास'च्या बातमीनंतर हा सोहळा रद्द करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाचे उद्घाटन करणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार स्वयंसेवी संघटनांनी केल्यामुळे हा उद्घाटन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे.


शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव दिलं आहे. उद्यानाची जागा महापालिकेची असली तरी त्यासाठीचा खर्च आपण स्वतः केल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे. त्याचप्रमाणे घरातील रहिवासी आणि महापालिका आयुक्त यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उद्यानाला शिंदे यांचे नाव देण्यास सहमती दर्शवण्यात आली होती, असही त्यांचे म्हणणे आहे. असे असलं तरी या नामकरनाला प्रशासकीय मान्यता नाही. परिणामी आजचा उद्घाटन सोहळा वादात सापडला होता. 


महत्वाचं म्हणजे याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या कार्यक्रमाबाबतही प्रशासन पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्या महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकेच्या प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित होणे अपेक्षित आहे. मात्र माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी स्वतः च दोन्ही कार्यक्रमांचा आयोजन केल आहे. त्यामुळे त्यावर टीका होत आहे.