आतिष भोईर, कल्याण : परराज्यातून कल्याण स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांपैकी 90 ते 95 टक्के लोकं कोरोनाची टेस्ट न करताच येत असल्याची बातमी झी 24 ने काल दाखवली होती. त्याची दखल घेत परराज्यातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची अँटीजन टेस्ट बंधनकारक करण्याचा निर्णय केडीएमसी आयुक्तांनी आज घेतला. केडीएमसी आयुक्तांसह आरोग्य अधिकारी आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे परराज्यातील येणाऱ्या नागरिकांनी 48 तासापूर्वीचा कोविड चाचणी अहवाल बाळगणे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. रस्ते मार्गाने महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश दिला जातोय. मात्र कल्याण रेल्वे स्थानकावर मात्र याच्या उलट चित्र असल्याचे झी 24 तासाच्या पाहणीत आढळून आले. 


बिनदिक्कतपणे कोणतीही टेस्ट न करता परराज्यातील प्रवासी कल्याणात दाखल होत असल्याचे धक्कादायक वास्तव काल झी 24 तासने मांडले. या प्रकारामुळे बऱ्याच दिवसांनी नियंत्रणात आलेली कल्याण डोंबिवलीची कोविड परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कल्याण डोंबिवलीतील दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 2500 वरून 200 च्या घरात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. या पार्श्वभूमीवर झी 24 तासाच्या बातमीची दखल घेऊन केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज रेल्वे अधिकाऱ्यांसोबत स्टेशन परिसरात पाहणी दौरा केला. परराज्यातील येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे अँटीजन टेस्ट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.