झी मीडियाचा दणका : कराडमधील भूमिहीन शेतमजुरांना दिलासा
राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील ९० भूमिहीन मजुरांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याबाबत `झी मिडिया`ने आवाज उठविल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळालाय.
विकास भोसले/ सातारा : राज्य शासनाने सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शेरे संजयनगर येथील ९० भूमिहीन शेतमजुरांना दिलेल्या घरकुल योजनेतील घरावर रेल्वे प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने कब्जा दाखवून संरक्षक भिंत बांधली होती. यामुळे ९० भूमिहीन मजुरांवर बेघर होण्याची वेळ आली होती. याबाबत 'झी मिडिया'ने आवाज उठविल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळालाय.
'झी मिडिया'ने रेल्वे प्रशासनाविरोधात आवाज उठवल्यामुळे मध्यरेल्वे कार्यकारी अभियंता व कराड प्रांताधिकारी , तहसीलदार यानी स्वत: याठिकाणी भेट देऊन या कामाला स्थगिती दिली. या संजयनगर नागरिकांनी 'झी मिडिया'चे आभार मानले आहे
शेरे संजयनगर येथील ९० अल्पभूधारकांना राज्य शासनाने १९७६ साली घरकुल योजनेतून घरे बांधून दिली. याच परिसरातून पुणे - मिरज लोहमार्ग जातो. सध्या पुणे - मिरज लोहमार्ग दुपदरी करण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्ष रेल्वे खात्याला ११ . ३७ हेकटर इतकी जमीन नावावर असताना १८ हेक्टर जमिनीवर ताबा सांगत आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची मनमानी करीत या ९० घरावर आपलाच ताबा सांगितल्याने मोलमजुरी करणाऱ्या ९० कुटुंबावर कुर्हाड कोसळली.
या सर्व घराची रीतसर नोंद ७/१२ उतारे असूनही हा अन्याय होत होता. शेतमजुरांना न्याय मिळावा व हक्काची घरे मिळावीत यासाठी संजयनगरमधील शेतमजुरांची 'झी मिडिया'ने आवाज उठविल्यामुळे या कामाला स्थगिती दिली.
सध्या रेल्वे प्रशासनाने दांडगाईने घरे पडून भिंत बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र 'झी मिडिया'च्या दणक्याने रेल्वे प्रशासनाने या कामाला स्थगिती दिली. ९० कुटुंब बेघर होण्यापासून वाचल्यामुळे या कुटुंबाने 'झी मिडिया'चे आभार मानले.
दरम्यान, राज्य शासनाने या मध्ये पुढाकार घेऊन ९० भूमिहीन शेतमजुरांचा हा प्रश्न सोडवावा व संजयनगरमधील शेतमजुरांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आलेय.