औरंगाबाद: माझी मुख्यमंत्री होण्याची कोणतीही इच्छा नाही. किंबहुना मी कधीच तसा दावाही केला नव्हता, असे वक्तव्य भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी केले. त्या गुरुवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. भगवानबाबा यांच्या जन्मगावी सावरगाव येथे नुकताच दसरा मेळावा पार पडला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह हेदेखील उपस्थित होते. अमित शाहांच्या भाषणादरम्यान काही कार्यकर्त्यांनी 'हमारी मुख्यमंत्री कैसी हो, पंकजा मुंडे जैसी हो', अशा घोषणा दिल्या होत्या. या  घोषणाबाजीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, मी या कार्यकर्त्यांना ओळखत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझी ही तिसरी टर्म असल्याने भाजपची परंपरा मला चांगल्याप्रकारे अवगत आहे. त्यामुळे नुसत्या घोषणा देऊन काही साध्य होत नाही, हे मला चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. दसरा मेळाव्यात कार्यकर्त्यांनी तशा भावना व्यक्त केल्या. परंतु, मला याबद्दल काहीच ठाऊक नाही. 


यापूर्वीही मी मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचा आरोप झाला होता. खरे तर विनोद तावडे यांनी तसे काहीतरी वक्तव्य केले होते. पण मी त्या वक्तव्याचा कधीच स्वीकार केला नाही, असे पंकजा यांनी सांगितले.


दरम्यान, या सगळ्या प्रकारावर भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. विशेष म्हणजे शाह यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात असताना पंकजा यांनी हात जोडून त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच उत्साहित होतील, याचा अंदाज आपल्याला आला नाही, असे पंकजा यांनी अमित शाह यांना सांगितल्याचे समजते.