औरंगाबाद: कोरोनाचे संकट राज्यात सर्वत्र पसरल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाण्यात अर्थ नाही. त्यांनी एकाच ठिकाणी बसून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. ते शनिवारी औरंगाबद येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाही, या विरोधकांच्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, लातूरच्या भूकंपावेळी ती समस्या राज्यातील केवळ एका भागापुरती मर्यादित असल्याने त्याठिकाणी मुख्यमंत्री कार्यालय हलवणे शक्य झाले. मात्र, आताचे संकट हे राज्यात सर्वदूर पसरले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी बसून काम करणे जास्त गरजेचे आहे. जेणेकरून सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवता येईल. आतादेखील मी मुंबईला परतल्यावर येथील सर्व गोष्टींची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, मला लोकांमध्ये जाण्याची आवड आहे. मी लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. त्यामुळे मला एकाजागी बसून राहवत नाही. माझ्या बऱ्यावाईट काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांनी मला मदत केली आहे. त्यामुळे आता संकटाच्या काळात त्यांची विचारपूस करण्यासाठी मी फिरत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. 


महाराष्ट्र, तामिळनाडूत परिस्थिती चिंताजनक
महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक यासारख्या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक आहे. तर महाराष्ट्रात नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण डोंबिवली अशी काही ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक असली तरी परिस्थितीत सुधारणा होत आहे. मुंबईपेक्षाही डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी चिंताजनक परिस्थिती आहे.