मुख्यमंत्री होणे साधी गोष्ट नव्हे- रामदास कदम
मी अशोक चव्हाणांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.
नांदेड: एरवी शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांमध्ये विळ्याभोपळ्याचे सख्य असले तरी बुधवारी नांदेड शहरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी एका उड्डाणपुलाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेडचे विद्यमान पालकमंत्री रामदास कदम एकत्र आले होते. यावेळी रामदास कदम यांनी अशोक चव्हाणांचा सत्कार करत त्यांची प्रशंसाही केली.
मी अशोक चव्हाणांचा सत्कार केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. प्रसारमाध्यमांनाही यामुळे खाद्य मिळेल. परंतु, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. एखादी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण राज्याचा कारभार पाहते. मुख्यमंत्रीपदापर्यंत जाणे ही काही सोपी बाब नाही. त्यामुळे मी अशोक चव्हाणांचा सत्कार केल्याने तुम्हा सर्वांच्या नजरेत माझी किंमत वाढली असेल, असे कदम यांनी सांगितले.