गजानन देशमुख, परभणी : हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुका. याच तालुक्यातील पिंपळदरी गावातील शहीद जवान कवीचंद भालेराव यांच्या वीरमाता रुख्मीनीबाई भालेराव यांची वृद्धापकाळात दुरावस्था झाल्याची बातमी झी 24 तासने पहिल्या लॉकडाऊनच्या काळात दाखवली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीरमाता रुख्मीनीबाई यांना वृद्धापकाळात कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना अनेक हाल अपेष्टाना सामोरे जावे लागत होते. ही बातमी सर्व प्रथम झी २४ तासने दाखविली. या बातमीची दखल घेऊन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या वीरमातेला आर्थिक मदत करण्याच्या सूचना हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना केल्या होत्या.


त्यानुसार जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पिंपळदरी गाठून त्यांना आर्थिक मदत दिली. त्यानंतर या मातेला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. तसेच त्यांना श्रावण बाळ योजनेअंतर्गत त्यांना पेन्शन सुरू करण्यात आली. 


झी २४ तासची बातमी दिवंगत खासदार राजीव सातव यांनी पाहून त्या वीरमातेला जगण्याचा आधार मिळावा यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेतून ४ एकर शेती देण्याची मागणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्याकडे केली होती.



त्यानंतर, दीड वर्षाच्या कालावधीनंतर सर्व नियम, अटी यांची पूर्तता करून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वीरमाता रुख्मीनीबाई भालेराव यांना पालकमंत्री वर्षां गायकवाड यांनी चार एकर जमिनीचा सात बारा देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.


झी २४ तासने सर्वप्रथम ही बातमी दाखविली. तसेच या वीरमातेला मदत मिळवून दिली याबद्दल वीरमाता रुख्मीनीबाई भालेराव आणि पिंपळदरी येथील नागरिकांनी झी 24 तासचे आभार मानले आहेत.