मुंबईत 10 टक्के पाणी कपात
पुरेसा पाणीसाठा होऊनही मुंबई तहानलेली
मुंबई : मुंबईकरांना पुढील सात दिवस पाणीकपातीला सामोरं जावं लागणार आहे. महापालिकेच्या पिसे उदंचन केंद्रामध्ये ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईत 10 टक्के पाणी कपातीसह कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
मुंबईत पाणी कपात सात दिवस असून ते ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या काळात असणार आहे. १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्यामुळे आवश्यक पाण्याची अतिरिक्त साठवण करून ठेवावी असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
दुरूस्तीच्या कामामुळे पाणीकपात करण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाने कळवले आहे. या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. मात्र पाणीपुरवठा यंत्रणेतील दुरुस्तीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांत अनेकदा पाणीकपात करावी लागली आहे. या वेळी ही पाणीकपात आठवडाभर राहणार असल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत जवळपास प्रत्येकाला 3 ते 4 तास पाणी उपलब्ध होते. 4,200 लक्ष लिटर पाण्याची मागणी होत असताना दररोज महानगरपालिका 3,750 लक्ष लिटर पाणी पुरवठा मुंबईला करत असते. दरवर्षी पाऊस गेल्यानंतर पुढील पावसापर्यंत 14.47 लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासकीय मंडळाकडे असते.
गेल्यावर्षी कमी पावसामुळे नोव्हेंबर महिन्यात 10 टक्के पाणी कपात करण्यात आले होते. मात्र यंदा पुरेसा पाऊस पडल्यामुळे पाण्याचासाठा पुरेसा झाला असून मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 तलाव पूर्ण भरले आहेत. असे असले तरीही पिसे उदंचन केंद्रामध्ये ‘न्यूमॅटिक गेट सिस्टीम’ची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्यामुळे मुंबईकरांना पुढील सात दिवस पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे.