राज्यात आता १०३ प्रयोगशाळांमध्ये होणार कोरोना चाचणी
राज्यात कोरोना चाचण्या ही वाढणार
मुंबई : राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या १०३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळा आहेत. २६ मे ते २० जून दरम्यानच्या काळात प्रयोगशाळांची संख्या ३० ने वाढ झाली आहे. यामुळे आता प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळला होता. सुरुवातीला मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण ५८४७ एवढी असून देशपातळीवरील हे प्रमाण ४६१० एवढी आहे.
देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पीटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. कालपर्यंत ७ लाख ७३ हजार ८६५ एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३२ हजार ७५ एवढे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटीव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे १७ टक्के आढळून आले आहे.
२६ मे रोजी राज्यात ७३ प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३ हजार ३४७ एवढे होते. २९ मे रोजी ७७ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३३८७ होते. ५ जून रोजी राज्यात ८३ प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ४०८६ एवढे होते. १२ जून रोजी ९५ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे ४८६१ एवढे होते. २१ जून रोजी १०३ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ५८४७ एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील प्रयोगशाळांची संख्या
मुंबई- 27(शासकीय 12, खासगी 15), ठाणे- 7(शासकीय 2, खासगी 5), नवी मुंबई- 3(शासकीय 1, खासगी 2), पुणे- 22, (शासकीय 10, खासगी 12), नागपूर- 11(शासकीय 7, खासगी 4), कोल्हापूर- 3(शासकीय 2, खासगी 1), नाशिक- 4(शासकीय 2, खासगी 2), सातारा- 2(शासकीय 1, खासगी 1), अहमदनगर- 2 (शासकीय 1, खासगी 1), पालघर (डहाणू)- 1, रत्नागिरी -1, सिंधुदूर्ग- 1,सांगली (मिरज)- 1, सोलापूर- 2, धुळे- 1
जळगाव- 1, अकोला- 1, अमरावती- 2, यवतमाळ- 1, गडचिरोली- 1, चंद्रपूर-1, गोंदिया - 1, वर्धा- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड- 1, लातूर- 1, परभणी- 1