मुंबई : इंधन दरवाढीचा फटका एसटीच्या तिकीटालाही बसला आहे. एसटीच्या तिकीट दरात १८ टक्क्यांनी वाढ करण्यता येत आहे. तिकीट दरवाढीचा हा निर्णय नाइलाजास्तव घेत असल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय. वाढते इंधनदर आणि कामगारांची वेतनवाढ यामुळे महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यासाठी ही दरवाढ करणं अपरिहार्य असल्याचं कारण एसटी महामंडळानं दिलंय. येत्या १५ जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. विशेष म्हणजे १५ जूनपासून एसटी प्रवासासाठी भाडे आकारणी ५ रुपयांच्या पटीत केली जाणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रवासाचं तिकीट ७ रुपये असेल तर त्याऐवजी ५ रुपये आकारले जातील. तर ८ रुपये तिकीट असलेल्या ठिकाणी १० रुपये तिकीटदर आकारला जाणार आहे. सुट्ट्या पैशांसाठी प्रवासी आणि एसटी वाहकांत नेहमीच वादावादी होते. यावर उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचं एसटी महामंडळानं सांगितलंय.