विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना २० टक्के अनुदान जाहीर
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय
मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना २० टक्के अनुदान दिलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. ज्या विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना आधीच २० टक्के अनुदान देण्यात आलं होतं आता त्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयाद्वारे विनाअनुदानित हा विषय संपवण्यात आला आहे.
मुंबईतल्या आझाद मैदानात गेल्या अठरा दिवसांपासून यासंदर्भात शिक्षकांचं आंदोलन सुरू होतं. शिक्षकांवर सोमवारी लाठीचार्जही करण्यात आला होता. त्यानंतर शिक्षक आमदारांना जाग आली. त्यांनी देखील विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर उपोषण सुरू केलं. शासन निर्णय काढला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार या आमदारांनी केला होता. त्यानंतर आज राज्य सरकारनं निर्णय घेत विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना २० टक्के अनुदान जाहीर केलं आहे.
आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदान देण्याचा निर्णय झाला मात्र हा निर्णय मान्य नसल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रचलित नियमांप्रमाणे १०० टक्के अनुदान मिळावे अशी त्यांची मागणी आहे. आझाद मैदानात गेले २० दिवस अनुदान मिळावे यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. तसंच आंदोलन सुरू राहणार असल्याचं शिक्षकांनी म्हटलं आहे.