आरसीएफ वसाहतीत 23 नागांच्या पिल्लांचा जन्म
मुंबईतील आरसीएफ वसाहतीत 23 नागांच्या पिलांचा जन्म झाला आहे.
प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील आरसीएफ वसाहतीत 23 नागांच्या पिलांचा जन्म झाला आहे. आरसीएफ वसाहतीत नागाची अंडी सापडली होती. त्यातूनच या पिल्लांनी जन्म घेतला आहे. पावसाळा सुरू झाला की साप आपल्या पिल्लाना जन्म देतो. जंगलांची कमी होत जाणारी संख्या, मोठ्या प्रमाणात होत असलेले बांधकाम यामुळे वन्य जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे. नागाची अंडी सर्पमित्रांना सापडल्याने नागांना जीवनदान मिळाले आहे.
मुंबईच्या आरसीएफ कॉलनीत एका ठिकाणी अंडी असल्याची माहीती सर्पमित्र सुनील कदम यांना कळवण्यात आली. यावर सर्पमित्र सुनील यांनी ही अंडी ताब्यात घेत डब्यात ठेवली होती.ज्या डब्यात अंडी ठेवली होती त्यातून दुसऱ्या दिवशी सकाळी नागाच्या पिल्लांनी जन्म घेतला आहे. नाग किंवा इतर सरपटणारे प्राणी मानवी वस्तीत सापडत असून त्यांना जीवनदान दिले तरच निसर्गचक्र पूर्ण होणार असल्याचे मत सर्पमित्र सुनील यांनी यावेळी व्यक्त केले.
आरसीएफ वसाहतीत दोन वर्षांपुर्वी देखील पिल्ले सापडली होती. हा जंगल परिसर असल्याने या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. जर असे काही जनावर सापडल्यास त्यास सर्पमित्रांकरवी जंगलात सोडले जाते. जन्म झालेली 23 नागची पिल्ले सुस्थितीत असून सर्वांना सुरक्षितपणे जंगलात सोडण्यात येणार आहे.