मुंबई : पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण ६३ पैकी २५ आमदारांना सत्ता सोडण्याचा निर्णय अजिबात मान्य नसून त्यांनी पक्षप्रमुखांना तसं स्पष्टपणे सांगितल्याचं कळतं. त्यामुळे शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांना हे २५ आमदार गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला.


सत्तेतून बाहेर पडण्यावरुन ‘मातोश्री’वरील बैठकीत गटबाजीचं राजकारण दिसून आलं. मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाहीत, असं पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. तसं झालंच तर शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता आहे.