3 Senior IPS Officers Suspended For Arresting Mumbai Based Actress: एखाद्या चित्रपटातील पटकथेला साजेशी घटना आंध्र प्रदेशमध्ये उघडकीस आली आहे. मुंबईमधील एका अभिनेत्री तसेच मॉडेलला चुकीच्या पद्धथीने अटक करुन तिचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेशमधील मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. रविवारी केलेल्या या कारवाईमध्ये तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर ही दंडात्मक कारवाई केली आहे. थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे. आपल्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास न करता थेट अटकेची कारवाई करण्यात आली. यामध्ये आपला मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला होता. या आरोपांच्या आधारे करण्यात आलेल्या चौकशीनंतर सरकारने मोठी कारवाई केली आहे.


कोण आहे ही अभिनेत्री? कोणाला करण्यात आलं निलंबित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या मुंबईकर अभिनेत्रीबरोबर आंध्र प्रदेशमधील पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार केला त्या अभिनेत्रीचं नाव आहे कादंबरी जेठवानी! कादंबरीने पोलिसांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केल्याचा आरोप करत थेट राज्य सरकारकडे तक्रार दाखल केली होती. अनेक हिंदी, मल्याळम, पंजाबी, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्रीनेच तक्रार दाखल केल्याने सरकारने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करुन तातडीने दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. पोलीस खात्याच्या चौकशीमध्ये तिन्ही अधिकारी दोषी आढळून आले आहेत. दोषी आढळून आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख पी. सीताराम अंजनेयुलू (डीजी दर्जा अधिकारी) माजी पोलीस उपायुक्त विशाल गुन्नी (अधीक्षक दर्जाचे अधिकारी) आणि विजयवाडाचे माजी पोलीस आयुक्त राणा टाटा (महानिरीक्षक दर्जा अधिकारी) या तिघांचा समावेश आहे. या तिघांनी अभिनेत्रीचा छळ केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 


नेमकं प्रकरण काय? 


मुंबईकर असलेल्या कादंबरी जेठवानी यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार, व्हायएसआर काँग्रेसचे नेते तसेच चित्रपट निर्माते विद्यासागर यांनी फेब्रुवारी महिन्यात आपल्याविरुद्ध फसवणूक आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता असं म्हटलं आहे. "विद्यासागर यांच्याबरोबर उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांनी माझा आणि माझ्या पालकांचा छळ केला. कोणतीही पूर्वसूचना न देता मला अटक करुन विजयवाडा येथे आणण्यात आल्या. पोलिसांनी कोणतंही ठोस कारण न देता बेकायदेशीरपणे मला ताब्यात घेतलं. त्यांनी माझ्या वयोवृद्ध पालकांनाही वाईट वागणूक देत त्यांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे त्यांनी कारण नसताना मला आणि माझ्या कुटुंबाला 40 दिवस न्यायालयीन कोठडीमध्ये राहण्यास भाग पाडले," असं घटनेचा तपशील देताना अभिनेत्री कांदबरीने जेठवानीने सांगितलं आहे. तिने ऑगस्ट महिन्यामध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एस. व्ही. राजशेखर बाबू यांच्याकडे सदर तक्रार केली होती. 


एफआयआरच्याआधीच अटकेचे आदेश


जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबाला चुकीच्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी पोलिसांनी जमिनीचा बनावट कागदपत्रे तयार करुन पोलिसांनी जामीन अर्ज करु दिला नाही, असा आरोप केला आहे. या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर आल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने या तिन्ही आयपीएस अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. "प्रथमदर्शनी पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिकाऱ्यांवरोधात कारवाई केली जात आहे. गंभीर गैरवर्तन तसेच कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे," असं सरकारी आदेशात म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे एफआयआर नोंदवण्याच्या आधीच पी. सीतारामा अंजनेयुलू यांनी अभिनेत्रीच्या अटकेच्या सूचना दिल्या होत्या अशी माहितीही समोर आली आहे. 31 जानेवारीला अटकेचे आदेश जारी झाले तर एफआयआर दाखल होण्याची तारीख 2 फेब्रुवारी आहे. ही तफावत म्हणजे मोठा गोंधळ असल्याचं चौकशीमध्ये निष्पण्ण झालं आहे. त्यानंतरच निलंबनाची कठोर कारवाई करण्यात आली आहे.