Central Railway TC Action: सणासुदीच्या काळात ट्रेनच्या तिकीटांची मागणी वाढते. तसेच सर्वच ट्रेन्समधील प्रवासी संख्या आणि वर्दळ वाढल्याचं चित्र पहायला मिळतं. मुंबईत तर परराज्यातून येणाऱ्या ट्रेन्सबरोबरच लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची गर्दीही सणासुदीच्या काळात वाढल्याचं चित्र पाहायला मिळतं. मात्र हीच वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन तिकीटाविना प्रवास करणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी विशेष मोहीम राबवत असते. वेगवेगळ्या स्थानकांवर वेगवेगळ्या वेळी असा मोहिमा राबवल्या जातात. अशाच एका मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय मार्गावरील एका रेल्वे स्थानकामध्ये एका दिवसात तब्बल 8 लाख 66 हजारांचा दंड वसूल करण्याची विक्रमी कामगिरी केली आहे.


कधी आणि कुठे राबवण्यात आली ही मोहीम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने तिकीटाविना प्रवास करणाऱ्यांविरोधात राबवलेल्या मोहिमेमध्ये 9 ऑक्टोबर रोजी म्हणजेच सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकात मोठी कारवाई केली. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये 120 टीसी आणि 30 जीआरपीएफ जवान तैनात करण्यात आले होते. म्हणजेच सोमवारी ठाणे रेल्वे स्थानकामध्ये पावलापावलावर टीसी होते. मध्य रेल्वेने केलेल्या या कारवाईमध्ये एकाच दिवशी ठाण्यातून ३ हजारहून अधिक फुकट्यांना पकडण्यात मध्य रेल्वेला यश आलं आहे. पोलिसांनी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत म्हणजेच 16 तासांमध्ये तब्बल 3 हजार 92 जणांना तिकीटाशिवाय पकडलं. या लोकांविरोधात करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईमध्ये तब्बल 8 लाख 66 रुपये मध्य रेल्वेने या फुकट्यांकडून वसूल केले आहेत.


फिल्मी स्टाइल इशारा


मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, 3092 जणांवर केलेल्या कारवाईमध्ये 8 लाख 66 हजार 405 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मुंबई रेल्वे मंडळाने उपनगरीय रेल्वे मार्गावरील स्थानकांवर मेल एक्सप्रेस ट्रेन, पॅसेंजर ट्रेन्स आणि विशेष ट्रेन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट यावेळी तपासली.



तसेच उपनगरीय रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरोधातही यावेळेस कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन ट्वीट करुन प्रवाशांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना देण्यात आला आहे. "तुम्ही आमच्यापासून लपत आहात आणि आम्ही तुमची स्टेशनवर वाट पाहतोय," अशा फिल्मी स्टाइलमध्ये प्रवाशांना रेल्वेने इशारा दिला आहे. 



एकाच टीसीने केली 2.25 कोटींची दंड वसुली


भारतीय रेल्वे वेळोवेळी अशाप्रकारे तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करत असते. या वर्षी मे महिन्यामध्ये उत्तर रेल्वेच्या अंबाला मंडळाने उपमुख्य तिकीट निरीक्षक सिमरनजीत सिंग वालिया यांनी तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा विक्रम नोंदवला होता. 300 दिवसांमध्ये त्यांनी तिकीटाशिवाय प्रवास करणाऱ्या 36,667 रंगेहाथ पकडलं होतं. सिमरनजीत यांनी एकूण 2.25 कोटींचा दंड वसूल केला.